बुधवार, ९ मे, २०१८

अमरदान........!

हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा’ अशी भक्तीपूर्ण याचना म्हणा किंवा प्रार्थना म्हणा.  आर्त आणि त्यागाच्या भावानं तुडूंब भरलेली हाक मानवतेला देण्याची गरज निर्माण झाली. देव अमर असतात, अशी आपली श्रद्धा!मृत्यूनंतरही जगायचं असेल तर आता अवयव दान करता येतं आणि  तेच दान मानवानं करावं अशी आर्त विनवणी जगभर केली जाते. आणि हीच हाक आज एका पत्नीनं ऐकली. नवऱ्याच्या मृत्यूचं दुःख बाजूला ठेवत धाडसी आणि आदर्शवत निर्णय घेतला. अवघ्या ३१ वर्षाच्या नवऱ्याचा अपघातात  त्याचा ब्रेनडेड झाला. मात्र आपलं दुःख बाजूला ठेवत पत्नीने केले पतीचे अवयवदान ! 


कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे दुमाला येथे राहणारे अमर पाटील हा स्प्रे पिटिंगचा व्यवयसाय करायचा. लग्न होऊन जेमतेम 7-8 वर्ष झाली असावीत. घरात छोटासा मुलगा आपली स्वप्न रंगवायला तयार ही झाला नसेल तोवर पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रवासात असताना येवती गावाजवळ एका वाहनांशी अमर पाटील यांची धडक झाली! आणि त्यात ते गंभीर जखमी झाले. डोक्याला मार बसल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआर येथे दाखल केले. त्यानंतर एका खासगी हॉस्पिटलला हलवण्यात आले. काही कळायच्या आतच सर्व घडल्याने पाटील यांच्या पत्नीची पायाखालची वाळू सरकली. डॉक्टरांचा निरोप आला! पाटील यांचा ब्रेनडेड झाल्याची बातमी कानावर येऊन धडकताच धक्काच बसला. उभं आयुष्य ज्याच्या सोबत काढायचं होतं तोच धनी आपल्याला अर्ध्यावाटेवरच सोडून जातोय याचं दुःख त्या माउलीला सहन झालं नसेल.  पण अशा परिस्थितीतही आपलं दुःख बाजूला सारून त्यांनी अमर यांचे हृदय, यकृत आणि किडनी दान करण्याचा निर्णय घेतला! आणि समाजासमोर एक चांगले उदाहरण ठेवले.

स्प्रे पेंटिंगचा व्यवसाय करून आपल्या आयुष्यात सप्तरंगाची उधळण करत असताना पाटील कुटुंबावर काळाने असा रंग उधळला ज्याने सारं कुटुंब हादरून गेलं. नुकतंच शाळेत गेलेलं पोर आताकुठं बापाच्या आयुष्यावर दोन धडे गिरवायला लागलं! त्यावेळी छोटंसं पोर बापाला मुकून बसले.  पण आपला पती आणि बाप अवयव रुपी जिवंत रहावा आणि दान केलेल्या अवयव उपयोगी पडलेल्या व्यक्तीचा आशीर्वाद आपल्या पोराला लाभावा या भावनेने पाटील यांच्या पत्नीने अवयव दान केले. अमर शरीररूपाने आपल्यात हजर नाही.परंतु  दान केलेल्या अवयव यांच्या माध्यमातून तो आज सुद्धा या विश्वात राहू शकतो, अशी पाटील कुटुंबायांची धारणा आहे. खरोखरच दुःखद प्रसंगात पण स्वतःला सावरून आपल्या पतीचे अवयव दानाचा निर्णय घेणाऱ्या त्या पत्नीला आणि कुटुंबाला सलाम.

- राहुल गडकर, बी न्युज, कोल्हापूर.